foodblog

तुमचा ‘पुरूमेंत’ झाला का?

सध्याचे दिवस पुरूमेंतचे. गोमंतकीय महिलांसाठी पुरूमेंत हा जिव्हाळ्याचा विषय. या समस्त महिलांनी एप्रिल – मे महिना हा पुरूमेंतसाठी राखून ठेवलेला असतो. गोव्यात वर्षभर कुठली न कुठली फेस्त – जात्रा होत असते पण मे महिन्यात होणारी ‘पुरूमेंत फेस्त’ हि महिला वर्गाला खास त्यांच्यासाठीच भरवलेली फेस्त वाटते. अस्सल गोवेकर मंडळींना पुरूमेंत म्हणजे काय हे सांगायला नको आणि महिलाच नाही तर घरातील पुरुषांशी याविषयावर बोलताना त्यांच्या बालपणातल्या पुरूमेंतशी संबंधित अनेक रम्य आठवणी निघतात. एवढं काय त्यात? असं तुम्हाला वाटेल पण पुरूमेंतचा संबंध थेट ‘रांधच्या कुडी’शी (स्वयंपाकघराशी) असल्यामुळे याचा मार्ग थेट आपल्या पोटातून जातो.

दोन वर्षांपूर्वी गोमन्तक तनिष्का व्यासपीठचे नव्या उमेदीने काम सुरु झालं आणि गोव्यातील विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना यात जोडण्यात आलं. इथूनच ‘तनिष्का पुरूमेंत फेस्त’ची कल्पना पुढे आली. साधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या – तिसऱ्या आठवड्यात पणजी, सांताक्रुझ, मडगाव इथं वार्षिक पुरूमेंत फेस्त होत असते. दरवर्षी ठरलेले व्यापारी, महिला वर्ग यात सहभागी होत असतो. पण ग्रामीण भागातील महिला ज्यांच्याकडे खात्रीलायक असे पुरूमेंतचे वेगवेगळे जिन्नस आहेत त्या काही या उल्लेख केलेल्या फेस्तमध्ये सहभागी होऊ शकत नाही. तनिष्का व्यासपीठ पुरूमेंत फेस्तच्या माध्यमातून आम्ही गोव्यातील कानाकोपऱ्यातील दर्जेदार असे जिन्नस, पदार्थ, धान्य, फळं भाज्या यांना एका छताखाली उपलब्ध करून देत आहोत. यात तुम्हाला अस्सल गोमंतकीय पुरूमेंत मिळेल.

पुरूमेंत म्हणजे काय?

ज्यांना पुरूमेंत शब्द माहित नाही त्यांना पुरूमेंत म्प्रहणजे काय असा प्रश्न पडला असेल.  तर पुरूमेंत म्हणजे साठवण.साठवून ठेवण्याच्या प्रक्रियेला कोंकणीमध्ये ‘पुरूमेंत’ असं छान नाव आहे. मूळ पोर्तुगीज शब्द ‘प्रोव्हिसाव’ वरून पुरूमेंत शब्द प्रचलित झाला. प्रोव्हिसाव म्हणजे प्रोव्हिजन म्हणजेच साठवणूक. हा शब्द समजताच लगेच ‘गणेश प्रोव्हिजन स्टोअर्स’, ‘दीपाली प्रोव्हिजन स्टोअर्स’ या दुकानांच्या पाट्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या. आता मात्र या प्रोव्हिजन स्टोअर्सला वगळून सर्वत्र ‘सुपर मार्केट’ असं वाचायला मिळतं आणि गल्लोगल्ली सुरु झालेल्या सुपर मार्केटमुळे आता वर्षभराची साठवणूक देखील दुर्मिळ झालीय. पण हे समीकरण गोव्याला लागू पडत नाही. पुरूमेंतसाठी मे महिना एकदम उत्तम. या दिवसात मुद्दाम वर्षभरासाठी लागणारी कडधान्ये, मिरसांग, आंबटाण, खारे सुकवलेले मासे, भिण्णांची  सोलं( कोकम) इ.खरेदी करतात.

मी स्वतः मागची वीस वर्ष गोव्यात विविध भागात भरणाऱ्या पुरूमेंत फेस्तमध्ये जाऊन तिथल्या वस्तू, पदार्थ यांचं निरीक्षण करत असते आणि यात असं लक्षात आलं कि या फेस्तमधून दिवसेंदिवस गोमंतकीय वस्तू हद्दपार होऊन बाहेरच्या वस्तूंचा शिरकाव होऊ लागला आहे. नारळ, मिरच्या, सोलं, आंबटाण, मिरे हे गोमंतकीय स्वयंपाकाचा आत्मा असलेले घटक. हेच जर अस्सल, खात्रीलायक मिळाले नाहीतर रोजच्या स्वयंपाकाच्या चवीवर परिणाम होणार. घराघरात बनणाऱ्या हुमणाच्या वाटणात स्थानिक मिरची लागते. उत्तर गोव्यात पेडणे- हरमलची मिरची आणि दक्षिण गोव्यात काणकोण-खोला भागातील मिरची वापरली जाते. पण याकाळात भरणाऱ्या पुरूमेंत बाजारात कर्नाटक – महाराष्ट्रातील मिरच्या विकण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. गोव्यातले पुरूमेंतचे जिन्नस तयार व्हायला मे महिना उजाडतो. हे जिन्नस कोण तयार करतात? गावातील महिला हे काम करतात. सध्या तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर तुम्हाला अंगणात मोठ्या प्रमाणावर सोलं वाळत घातलेली, आळसांदे सुकायला ठेवलेले, मिरच्यांना ऊन देणं, आंबटाण (चिंच) स्वच्छ करणं, मिऱ्यांना सुकवणे अशी कामं करताना महिला दिसतात. पुरूमेंत बाजारात दुकानं थाटणारा व्यापारी वर्ग आता या ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचत नाही. होलसेल बाजारातून पुरूमेंतचे जिन्नस विकत घेऊन तेच या बाजारात विक्रीला ठेवायचं प्रमाण वाढलंय. गोव्याच्या ग्रामीण भागातील प्रसिद्ध असणारे जिन्नस, फळं ‘तनिष्का पुरूमेंत फेस्त’मध्ये उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. तनिष्का व्यासपीठच्या सभासद असलेल्या आणि वर्षभर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या महिला गेले महिनाभर पुरूमेंत फेस्तची तयारी करत आहेत.

तुम्हाला वाटेल आजच्या काळात  इन्स्टामार्ट, ऑनलाईन मार्केटवर सगळं काही मिनिटात मिळतं तर मग हे कशाला साठवून ठेवायचं? गोव्यातला स्वयंपाक बाजारात मिळणार्‍या तयार मसाल्यांनी होत नाही. इथं रोज ताजा वाटलेला मसाला वापरला जातो आणि यासाठी नारळ, सुक्या मिरच्या, मिरे, चिंच, सोलं, तेरफळं हे वर्षभर पुरेल इतकं घेऊन ठेवावं लागतं. यासाऱ्या गोष्टी बाजारात सतत मिळत नाही. हे मिळण्याचा मे महिना हा सर्वोत्तम काळ असतो. यातूनच ‘पुरूमेंत’ प्रकार तयार झाला.

तनिष्का पुरूमेंत फेस्तचे वैशिष्ट्य

गोव्यातील ग्रामीण भागातील वैशिट्यपूर्ण अशा प्रत्येक वस्तू, जिन्नस यांना या फेस्तमध्ये स्थान देणार आहोत. मुख्य म्हणजे हरमल आणि काणकोणच्या प्रसिद्ध मिरच्या, साळ भागातील आळसांदे आणि चवळी, ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या अंगणात सुकवलेली सोलं (आटम-कोकम), आंबटाण, खारवी समाजातील महिलांच्या गटातील सुकी मासळी, काजू बिया, खळातली तोंरा, लोणचे – पापड, सांडगे – वडियो, घरगुती गरम मसाले, खास सारस्वत सांबार मसाला, फणसाचे तळलेले गरे, गावठी मीठ, खोबरेल तेल, उकडे तांदूळ, नाचणी, हळद -मिरी, काणकोण खोतीगावचा सेंद्रिय पद्धतीने बनवलेला गुळ याशिवाय लोणच्याची कैरी, आंबे, फणस, कणगा, याशिवाय वेगवेगळ्या गावातली ताजी भाजी अशा साऱ्या स्वयंपाकघरातील चव वाढवणाऱ्या अनेक गोष्टी तनिष्का पुरूमेंत फेस्तचे मुख्य आकर्षण असणार आहे. याशिवाय संध्याकाळी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर होतील. आपल्या घरातील यावर्षीचा पुरूमेंत करण्यासाठी ‘तनिष्का पुरूमेंत फेस्त’ला अवश्य भेट द्या. पुढच्या शनिवार-रविवार म्हणजेच ४ आणि ५ मे २०२४ ला पणजीतील सेंट ओरोइओ गार्डन, महावीर उद्यान समोर, कंपाल इथे भरवण्यात आहोत. दोन दिवस चालणाऱ्या या फेस्तमध्ये पेडणे ते काणकोणपर्यंत मिळणारे सारे प्रसिद्ध पुरूमेंत इथे एकाच छताखाली मिळतील. आपण अवश्य या ‘तनिष्का पुरूमेंत फेस्तला भेट देऊन आपला पुरूमेंत खरेदी करा. भेटूया पुढच्या रविवारी तनिष्का पुरूमेंत फेस्तमध्ये.

गोमन्तक 28 एप्रिल 2023


मनस्विनी प्रभुणे नायक


https://gathanmala.wordpress.com

https://foodandtravel365days.wordpress.com

यावर आपले मत नोंदवा